पुणे : महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये गेल्या १२ दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाला होता. आता ही समस्या दूर झाली असून दाखल्यांची यंत्रणा पूर्ववत झाली आहे. मात्र, सर्व्हर अद्यापही संथगतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना महा-ई-सेवा केंद्रांतून दाखले काहीशा विलंबाने मिळत आहेत.
राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून शासकीय परवानगी, जात पडताळणी दाखले-प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक कारणास्तव रखडले होते. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लागत होत्या. तसेच अनेक केंद्र बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. पुणे शहरात २५०, तर ग्रामीण भागात १४३५ महा-ई-सेवा केंद्र आणि १४ सेतू केंद्र आहेत. दहावी, बारावीच्या वर्गांचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या प्रमाणपत्रापासून रहिवासी दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेश देखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. काही महाविद्यालये प्रवेशासाठी दाखले आवश्यक असल्याचा आग्रह करत होत्या. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना समस्या येत होत्या.
दरम्यान, महा-ई-सेवा केंद्रांच्या सर्व्हरची समस्या काही प्रमाणात दूर झाली असून प्रमाणपत्रांसाठीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, गेल्या बारा दिवसांपासून आधीचे अर्ज प्रलंबित असल्याने ते अर्ज पहिल्यांदा मंजूर करून दाखले दिले जात आहे. सर्व्हर अद्यापही संथगतीने सुरू असल्याने दाखले काहीशा विलंबाने मिळतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोमवारी सांगण्यात आले.
नेमकी समस्या काय?
महा-ई-सेवा तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटीअंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात विदा (डाटा) संचयित झाला होता. परिणामी क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित विदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. तसेच किरकोळ तांत्रिक बिघाड दूर करण्यात येत होते. ४३ लाख जुने दाखले दुसऱ्या सर्व्हरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. या कामासाठी सलग चांगल्या इंटरनेट वेगाची गरज असते. अशा विविध तांत्रिक कारणांमुळे महा-ई-सेवा केंद्रांची सेवा पूर्ववत होण्यास विलंब लागला, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.