पुणे : ग्राहक आयोगाच्या कामकाजात तांत्रिक बाबींचा वापर, तसेच जलदगतीने निकाल लागावा, या विचाराने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ‘ई-जागृती’ नावाचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. मात्र, चार महिन्यांनंतरही संकेतस्थळ पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने तक्रारदार ग्राहकांसह वकिलांना गैरसाेयीला सामोरे जावे लागत आहे.
देशभरातील सर्व ग्राहक आयोगांचे कामकाज अद्ययावतपणे चालावे, तक्रार दाखल करण्यापासून निकाल लागेपर्यंत तांत्रिक बाबींचा वापर व्हावा आणि जलदगतीने निकाल लागावा, यासाठी ग्राहक आयोगाचे ‘कॉन्फोनेट’ हे जुने संकेतस्थळ बंद करून ‘ई-जागृती’ हे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले. मात्र, नवीन संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार दावे (ई-फायलिंग) करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
फाइल अपलोड झाल्यानंतर शुल्क भरता येत नाही, तसेच शुल्क जमा झाले तरी ते अद्ययावत (अपडेट) होत नाही. ग्राहक आयोगाचे निकाल त्वरित संकेतस्थळावर येत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
ग्राहक आयोगाने दिलेला निकाल मान्य नसेल, तर तक्रारदार वरिष्ठ आयोगाकडे अपील करतो. हे अपील करण्यास काही कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्या कालावधीत अपील न केल्यास पक्षकार अपील करण्याचा अधिकार गमावतो. पक्षकारांकडून अपील केल्यावर अपिलाचा क्रमांक किंवा अपील केले आहे की नाही, हे मात्र यंत्रणेत दिसत नाही. त्यामुळे अपील दाखल करून घेण्यासाठी पक्षकार आणि वकिलांना सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे. त्यामुळे, अपिलाची मुदत संपली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न वकिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यापासून निकाल मिळविण्यापर्यंत अनेकदा पाठपुरावा करावा लागतो. नवीन संकेतस्थळ सुरू झाल्यापासून त्यातील विविध तांत्रिक त्रुटींमुळे कामकाजात अनेक अडचणी येत आहेत. या परिस्थितीत सर्व बाबी वेळेत अद्ययावत (अपडेट) होणे गरजेचे आहे.
– ॲड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, कन्झ्युमर ॲडव्होकेट असोसिएशन, पुणे –