पुणे : सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी विकसित केलेल्या स्किन स्प्रे गन या उपकरणाचे आता व्यावसायिक पद्धतीने उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञान हस्तांतरण सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने पॅसिफाय मेडिकल टेक्नॉलॉजीज या नवउद्यमीला केले असून, हे सीओईपीचे पहिलेच तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यावसायिकीकरण ठरले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, प्रा. एन. बी. ढोके, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अधिष्ठाता प्रा. पी. ए. सदगीर, विभागप्रमुख डॉ. संदीप अनासाने यांच्या उपस्थितीत झाला. विशेष म्हणजे, तंत्रज्ञान परवाना मिळवणारी कंपनी पॅसिफाय मेडिकल टेक्नॉलॉजीज नवउद्यमी सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटरमध्ये उदयाला आली आहे. त्यानंतर या नवउद्यमीचे आयआयटी मुंबई येथे इन्क्युबेशन झाले. या नवउद्यमीद्वारे जखम उपचारातील कठीण समस्या सोडवण्यासाठी सुलभ आणि प्रभावी उपाय विकसित करत आहे.
स्किन स्प्रे गन या वैद्यकीय उपकरणामध्ये मोठ्या जखमा झाकण्यासाठी त्वचेचे सूक्ष्म कण समप्रमाणात फवारण्याची क्षमता आहे. हे उपकरण ट्रॉमा, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन जखमांच्या उपचारांसाठी अधिक परिणामकारक आणि वेगवान पर्याय सादर करते. विशेषतः भाजलेल्या रुग्णांमध्ये आरोग्यदायी त्वचेचा साठा मर्यादित असताना हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. सुलभ रचना, कमी खर्च व जलद कार्यक्षमतेमुळे हे उपकरण त्वचा पुनर्निर्मिती आणि जखम उपचार प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. सीओईपीतील साईप्रसाद पोयरकर, चेतन महाले आणि डॉ. संदीप अनासाने यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. निखिल पानसे यांच्या सहकार्याने या उपकरणासाठीचे संशोधन केले. डॉ. पानसे यांचे वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपकरण प्रत्यक्ष उपयोगासाठी उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले.