पुणे : गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सक्सेस स्टोरी नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी गद्दारी करून ते मोदींचे, गुजरातचे गुलाम झाले. गुजरातमधून आलेले दोन लोक मुंबई, महाराष्ट्राला लुटत आहेत, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला. तसेच हिंदू-मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजप प्रत्येक निवडणुकीत करते. हिमाचल प्रदेशात ९५ टक्के हिंदू असूनही त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे या प्रचाराचा परिणाम होणार नाही, असे मतही त्यांनी मांडले.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रेड्डी बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – बकालीकरणाकडे…

हेही वाचा – शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना

रेड्डी म्हणाले, की भाजप आता मैदान सोडून पळत आहे. महाराष्ट्रात निवडणूक असताना पंतप्रधान परदेशी फिरत आहेत. भाजपने पराभव मान्य केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी देश तोडत आहेत. अकरा वर्षे पंतप्रधान असूनही मोदींकडे बोलण्यासारखे काही नाही. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, दोन कोटी नोकऱ्या, २०२० पर्यंत गरीबांना घर होईल या घोषणा ते पूर्ण करू शकले नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट अन्यायकारक शेतकरी कायदे झाले. त्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्यू पावले. गेल्या वर्षी देशात सर्वाधिक २० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. याबाबत भाजप काही बोलत नाही. दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करून केवळ ८ टक्के नोकऱ्या दिल्या. शेतकरी, तरुण, गरीबांसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसने दिलेल्या गॅरेटी पूर्ण केल्या आहेत. भाजपमध्ये हिंमत असल्यास एक समिती करून तेलंगणाला पाठवा, त्याचा मी खर्च करतो. २३ लाख शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ही गॅरेंटी दिली. तेलंगणा सरकारने १० महिन्यांत ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महिलांसाठी बसप्रवास मोफत आहे. १ कोटी दहा लाख महिलांनी त्याचा लाभ घेतला. या योजनेसाठी ३६०० कोटी खर्च केले. ५०० रुपयांत सिलेंडर देण्यात येतात. शहरातील गरिबांना २०० युनिट वीज मोफत दिली जाते. १ कोटी ५० लाख मेट्रिक टन धान्य उत्पादन झाले. त्याला सरकारकडून हमीभाव आणि ५०० रुपये बोनस देत आहोत. आम्ही मोदींसारखी फसवी गॅरेंटी देत नाही.