तेलंगणातून कौटुंबिक वादातून घरातून बेपत्ता झालेल्या १३ वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. खडकी पोलीस, तसेच जागरुक नागरिकांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समरा अवस्थी सोंगाला (वय १३, रा. कपोली, तेलंगणा) असे मुलीचे नाव आहे. ८ फेब्रुवारी खडकीतील क्रिस्टल सोसायटी परिसरात मुलगी फिरत होती. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी या परिसरात गस्त घालत होत्या. संग्रामसिंग आणि विनोदसिंग यांनी तिला पाहिले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहायक निरीक्षक वालकोळी, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, वैभव मगदुम, सुपे, जगताप, अहिवळे यांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा मुलगी दाक्षिणात्य भाषेत बोलत होती. पोलिसांना तिच्याशी संवाद साधताना अडचण आली. पोलिसांनी तेलगू भाषा जाणणाऱ्या एका नागरिकाच्या मदतीने मुलीशी संवाद साधला. तेव्हा तिने तेलंगणातून रेल्वेने पुण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे नाव आणि पत्ता विचारला. त्यानंतर तेलंगणातील नशिराबाद पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा समरा बेपत्ता झाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती खडकी पोलिसांना मिळाली.

हेही वाचा – पुण्यात लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

हेही वाचा – करोना रुग्णसंख्या सरकारी आकडेवारीपेक्षा १७ पट अधिक, बनारस हिंदू विद्यापीठाचा अहवाल

पोलिसांनी या घटनेची माहिती बाल कल्याण समितीला दिली. तिला बाल कल्याण समितीच्या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले. समराचा भाऊ सागाला आणि नशिराबाद पोलीस ठाण्यातील कर्मचारी हर्षद पाशा खडकी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसाेडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana girl missing found in pune handed over to her family by khadki police pune print news rbk 25 ssb