पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पाऊस यंदाच्या हंगामात झाला आहे. चारही धरणे दोनवेळा भरतील एवढा पाऊस यंदाच्या हंगामात झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा- विद्यापीठ शुल्कवाढ विरोधातील आंदोलन स्थगित
चारही धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. सध्या एकूण पाणीसाठा २९.९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.७७ टक्के झाला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत शहरी भागाला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तसेच यंदा पूर्वमोसमी पावसानेही धरणांच्या परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली आणि ४ जुलैपासून पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला.
यंदा हंगामात १२ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव हे धरण १३ ऑगस्ट आणि १५ सप्टेंबर रोजी टेमघर धरण १०० टक्के भरले. दरम्यान, सन २०२१ आणि सन २०२० मध्ये १४ ऑक्टोबरपर्यंत चारही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, यंदाच्या हंगामापेक्षा धरणांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला होता. सन २०१९ आणि सन २०१८ मध्ये मात्र, यंदाच्या हंगामापेक्षा अधिक पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झाला होता, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा- VIDEO : “वाचवा रे!…बसचालक त्रास देतोय, मदत करा, उतरू देत नाही” असं म्हणत प्रवाशाने ठोकली बोंब
गेल्या तीन वर्षातील १४ ऑक्टोबरपर्यंतचा पाऊस (मि.मी.) आणि क्षमता (टीएमसी)
वर्ष टेमघर वरसगाव पानशेत खडकवासला
२०२२- ३४७४ २५६८ २५७१ ८५१
२०२१ -३०४३ २०२३ २०४७ ६८६
२०२०- २८५२ २१३१ २२४० १०७६
साठवण क्षमता ३.७१ १२.८२ १०.६५ १.९७