कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे निर्माण झालेली पावसाळी स्थिती आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने थंडीसाठी हक्काच्या असणाऱ्या डिसेंबरमध्येच थंडी झाकोळली. मात्र, थंडीची ही कसर जानेवारीमध्ये भरून निघण्याची शक्यता आहे. देशासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या महिन्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शनिवारी (३१ डिसेंबर) जाहीर केला. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीखाली राहणार असल्याने उन्हाचा चटका कमी असेल.
हेही वाचा- मटण, मासळीवर ताव मारुन खवय्यांचा सरत्या वर्षाला निरोप; मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी
दरवर्षीनुसार यंदाही डिसेंबरमध्ये राज्यात थंडीची कडाका अधिक असेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे थंडीवर परिणाम झाला. चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही राज्याच्या दिशेने बाष्प आले. परिणामी डिसेंबरमधील काही दिवस वगळता बहुतांश वेळेला राज्यातील रात्रीचे किमान तापमान बहुतांश वेळेला सरासरीच्या पुढेच राहिले. दिवसा निरभ्र आकाशाची स्थिती राहिल्याने दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढे जाऊन उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे याच महिन्यात मुंबई परिसरात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
भारतीय हवामान विभागाने जानेवारी महिन्यातील तापमान आणि पावसाच्या प्रमाणाचा अंदाज शनिवारी जाहीर केला. त्यानुसार संपूर्ण भारतामध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य भारताचा बहुतांश भाग, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात जानेवारीमध्ये किमान तापमान सरासरीखाली राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील राज्ये, पूर्वोत्तर भारतात बहुतांश ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीजवळ किंवा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमान सरासरीखाली राहून या भागात थंडी राहणार आहे. दक्षिण कोकणातील किमान तापमान सरासरीजवळ राहील. महाराष्ट्राच्या उर्वरित किनारपट्टीच्या भागात किमान तापमान काही प्रमाणात सरासरीपुढे राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक बदल
नव्या वर्षाची सुरुवात गारव्याने
नाताळपासून वर्ष अखेरीपर्यंतचा थंडीचा कडाका यंदा जाणवला नसला, तरी २०२३ या नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात काही प्रमाणात गारवा निर्माण होणार आहे. सध्या उत्तरेकडील राज्यांत थंडीचा कडाका आणि धुक्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस तापमानात घट होऊन थंडी निर्माण होणार आहे. त्यानंतर तापमानात किंचित चढ-उतार होईल. सध्या राज्यात सर्वत्र किमान आणि कमाल तापमान सरासरीपुढे आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातच काही प्रमाणात गारवा आहे. शनिवारी पुणे येथे राज्यातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ नाशिक, महाबळेश्वर, औरंगाबाद, अमरावती, गोंदिया आदी भागांत १४ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली.