उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी अवतरली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सध्या तापमानात किंचित वाढ झाली असली, पश्चिमी चक्रवातामुळे पाकिस्तानपासून वारे वाहून काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्यातून पुढील दोन-तीन दिवसांनंतर तापमानाचा पारा पुन्हा झपाट्याने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संक्रांतीच्या कालावधीत थंडी आणखी वाढू शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ रेल्वे गाड्या उद्यापासून रद्द; पुणे-नागपूर गाड्या बदललेल्या मार्गाने

सध्या उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट कायम असल्याने या भागात थंडीचा कडाका आहे. कोकणातही अनेक भागांत तापमानात घट होत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. हिमालयीन विभागात होणारी बर्फवृष्टी आणि त्यामुळे उत्तरेकडील राज्यांतून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी घट झाली. दोन दिवसांपासून तापमान झपाट्याने खाली गेले. ९ आणि १० जानेवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती होती. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी भागांत ५ ते ६ अंश हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी घटले होते. त्यामुळे कडाक्याची थंडी निर्माण झाली. सध्या उत्तरेकडील थंडीच्या लाटेची तीव्रता घटली आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी गारठा कायम आहे.

हेही वाचा- दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसहभागातून कृती कार्यक्रम, राज्य मंडळातर्फे पहिल्यांदाच उपक्रम

सध्या राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्याचप्रमाणे आकाशही निरभ्र आहे. त्यामुळे थंडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोकण विभागातील तापमानातही घट होत आहे. उत्तरेकडे नव्याने पश्चिमी चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. पाकिस्तानपासून चक्रीय वारे तयार झाले आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरसह हिमालयीन विभागात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत पुन्हा बर्फवृष्टी जोर धरण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढून महाराष्ट्रातील तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature drop in maharashtra due to cold wind currents coming from north pune print news pam 03 dpj