प्रचंड उकाडय़ात बुधवारी शहरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी गुरुवारी तापमान पुन्हा वाढले आहे. एप्रिल ते जूनमध्ये कडक उन्हाचा त्रास होऊन उष्माघाताची शक्यता असते, त्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
एप्रिलच्या सुरुवातीपासून कमाल तापमान पुण्यासाठी त्रासदायकच ठरले आहे. २ आणि ३ एप्रिलला तर शहरात पाऱ्याने चाळीशी गाठली. त्यानंतर कडक उन्हाबरोबरच ढगाळ वातावरणदेखील सुरू झाले. मंगळवार व बुधवार ढगाळ राहिलेले हवामान आणि त्यातच बुधवारी पडलेला पाऊस यामुळे दिवसाचे तापमान ३६.८ अंश सेल्सिअसवर उतरले. पावसामुळे कमाल तापमान १ ते २ अंशांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु गुरुवारी पुन्हा ३८.१ कमाल तापमानाची नोंद झाली आहे. १० व ११ एप्रिलला दिवसाचे तापमान पुन्हा ४० अंशांवर जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
वाढत्या उष्म्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासंबंधी आवाहन केले आहे. उष्म्याच्या त्रासाने थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, पोट दुखणे, पोटऱ्यांमध्ये वेदना होणे, गोळे येणे, तसेच रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, निरुत्साह, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे टाळावीत तसेच काळे, भडक रंगाचे वा घट्ट कपडे वापरू नयेत, उन्हात काम करताना अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी, सरबत प्यावे. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, स्कार्फ वा टॉवेलसारखे काहीतरी घ्यावे, गॉगल वापरावा. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित काम थांबवून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे पालिकेने म्हटले आहे.
उपचार काय?
– उष्माघाताच्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखा, कूलर वा वातानुकूलित यंत्रणा सुरू करावी.
– रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
– रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात.
– गरज भासल्यास शीरेवाटे सलाईन द्यावे वा इतर वैद्यकीय मदत घ्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा