पुणे : राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाल्याने थंडी घटली आहे. राज्यात काही ठिकाणी आणि मुख्यत: दक्षिणेलगतच्या भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होत असल्याने पुढील चार ते पाच दिवस तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्याच्या सर्वच भागांतील तापमानात मोठी घट झाली होती. निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे थंडीला पोषक वातावरण तयार झाले होते. २० नोव्हेंबरला राज्यात हंगामातील आणि काही भागांत गेल्या दहा ते बारा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४ ते ६ अंशांनी घट झाली होती. मात्र, २१ नोव्हेंबरपासून दक्षिणेकडील पावसाळी वातावरणाचा परिणाम राज्यावर होऊ लागला. त्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन तापमानात पुन्हा वाढ झाली. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागांत अद्याप किमान तापमान सरासरीखाली आहे.
जळगाव येथे बुधवारी राज्यातील नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात इतरत्र तापमान १० अंशांपुढे आणि सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढले आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, उस्मानाबाद, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर आदी भागांत आणि कोकणात काही ठिकाणी रात्रीचे किमान तापमान काही प्रमाणात सरासरीखाली असल्याने या भागांत थंडी घटली असली, तरी गारवा कायम आहे.