पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्यामुळे हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. मात्र, थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे प्रमाणही वाढले असून, तेही थंडीच्या हंगामातील उच्चांकी पातळीवर जात आहे. संपूर्ण पुण्याची सर्वसाधारण हवा प्रदूषण मध्यम पातळीवर असली, तरी तापमानात सर्वाधिक घट असलेल्या शिवाजीनगरमध्ये हवेचे प्रदूषण शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अतिवाईट स्थितीत पोहोचले होते. कोथरूड आणि हडपसरची हवाही वाईट स्थितीत होती.
हेही वाचा >>>पुणे: कल्याणीनगरमध्ये तरुणीचा मोबाइल हिसकावणारे चोरटे गजाआड; मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघड
केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या संस्थेकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने तपासली जाते. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टीक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म प्रदूषणकारी कणांचे हवेतील प्रमाण मायक्रॉनमध्ये मोजले जाते. १ ते १०० मायक्रॉनपर्यंत या कणांचे प्रमाण हवेत असल्यास स्थिती उत्तम किंवा समाधानकारक समजली जाते. १०० ते २०० हे प्रमाण मध्यम, तर २०० ते ३०० मायक्रॉन प्रमाण हवेची गुणवत्ता वाईट असल्याचे दर्शविते. ३०० ते ४०० अतिवाईट स्थिती, तर ४०० ते ५०० मायक्रॉन हे हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण तीव्र प्रदूषण किंवा अतिधोकादायक पातळीवर समजले जाते. या निकषांनुसार ‘वाईट’ गटापासूनची हवा आरोग्यास हानिकारक ठरते.
हेही वाचा >>>अजित पवारांनी बारामतीसाठी मंजूर केलेल्या २४५ कोटींच्या विकासकामांना चंद्राकांत पाटील यांची कात्री
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट नोंदविली जात आहे. याच आठवड्यात पुणे शहरात आणि विशेषत: शिवाजीनगर हवामान केंद्रावर दोनदा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा पारा १२.६ अंशांपर्यंत खाली आला. त्याबरोबरीनेच हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाणही वाढत गेले. पुणे शहरातील एकूण सरासरी हवेची पातळी पाहिल्यास ती १४० मायक्रॉन या समाधानकारक पातळीवर आहे. मात्र सर्वात थंड असलेल्या शिवाजीनगरची हवा चांगलीच बिघडली आहे. या भागांत प्रदूषणकारी अतिसूक्ष्मकणांचे हवेतील प्रमाण ३०३ मायक्रॉनपर्यंत गेले आहे. त्यापाठोपाठ कोथरूड आणि हडपसर भागातील हवेत प्रदूषणकारी कणांचे प्रमाण अनुक्रमे २२१, २५९ मायक्रॉन आहे. त्यामुळे हे विभाग हवेच्या गुणवत्तेत वाईट स्थितीत गेले आहेत. कात्रज, पाषण आणि पिंपरी-चिंचवडमधील निगडी विभागात मात्र समाधानकारक स्थिती आहे.
हेही वाचा >>>पुणे: ‘सर्वकार्येषु सर्वदा’ने लढण्याला बळ; राज्याच्या विविध भागांत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भावना
नेमके झाले काय?
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यंदा मोसमी पाऊस लांबला. पावसात प्रदूषणकारी कण हवेत राहण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी या काळात ऑक्टोबरचा शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत होती. दिवाळीत पाऊस थांबला आणि थंडी अवतरली. त्यामुळे वाहनांतील धूर आणि इतर प्रदूषणकारी कणांचे हवेतील प्रमाण लगेचच वाढले. त्यात दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचीही भर पडली. त्यानंतर तापमानात घट होत असताना प्रदूषणकारी कण हवेच्या खालच्या स्तरात रहात असल्याने हवा प्रदूषणातील वाढ कायम राहिली.
ठिकाण——-कणांचे प्रमाण (मायक्रॉन)—–स्थिती
शिवाजीनगर———३०३———–अतिवाईट
हडपसर————२५९———–वाईट
कोथरूड———–२२१———–वाईट
आळंदी————१५४———–मध्यम
भोसरी————-१४९———–मध्यम
भुमकर चौक——–११४———–मध्यम
लोहगाव———–११०———–मध्यम
पाषाण————-८१———-समाधानकारक
निगडी————-६३———-समाधानकारक
कात्रज————-६१———-समाधानकारक