पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे राज्यभरात किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
मागील आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहे आणि दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. या सर्वांचा परिणाम राज्यात ढगाळ वातावरण आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सोमवारी राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सोमवारी जळगावात ११, नाशिक १५.१, पुणे १५.२, कोल्हापूर २१.६, महाबळेश्वरात १७.१ आणि सोलापुरात १८.५ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातही किमान तापमानात वाढ झाली आहे. अकोल्यात १७, अमरावती १६.३, नागपूर १७.२ आणि यवतमाळमध्ये १५.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये १३.६, नांदेड १७.६ आणि परभणी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सातांक्रुझमध्ये ३६.८ अंश सेल्सिअसची नोंद
सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाली. सांताक्रुझमध्ये ३६.८, अलिबागमध्ये ३४.८, रत्नागिरीत ३६.३ आणि डहाणूत ३५.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किमान तापमानही सरासरी २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले.