कोकणासह राज्याच्या अनेक भागात उकाडा वाढला असून, मुंबईत तर त्याची तीव्रता खूप जास्त आहे. मुंबईत सांताक्रुझ येथे तापमान तब्बल ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर कोकणात भीरा येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची (४३.५) नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही पारा ४० अंशांच्या पुढे सरकू लागला आहे. पुढील दोन-तीन दिवसांतही उकाडा कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मार्च महिन्याच्या निम्म्या कालावधीत पाऊस आणि काही प्रमाणात गारवा कायम होता. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून उकाडय़ात वाढ होऊ लागली आहे. त्यातच सकाळपासून आकाशात काही प्रमाणात ढग जमा होत असल्याने घामाच्या धारा लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच बुधवारी प्रचंड उकाडा जाणवत होता. विशेषत: मुंबईसह किनारी भागात त्याची तीव्रता अधिक होती. कोकणातच असलेल्या भीरा (जिल्हा- रायगड) येथे तर कमाल तापमान ४३.५ अंशांपर्यंत पोहोचले होते. या उकाडय़ामुळे उष्माघाताचा त्रास वाढू लागला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत काही ठिकाणी दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
राज्यात बुधवारी नोंदवले गेलेले कमाल तापमान
*कोकण
मुंबई (कुलाबा) ३६.३, सांताक्रुझ ४०.८, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३४.८, भीरा ४३.५
*मध्य महाराष्ट्र
पुणे ३७.७, जळगाव ४०.३, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४०.८, नाशिक ३८.५, सांगली ३७.४, सातारा ३८.२, सोलापूर ४०.८
*मराठवाडा
उस्मानाबाद ४०, औरंगाबाद ३८.४, परभणी ३९.१
*विदर्भ
अकोला ४०.५, अमरावती ३७.८, बुलढाणा ३७.२, चंद्रपूर ४०.४, ब्रह्मपुरी ३९.७, नागपूर ३९.८, वाशिम ३८.२, वर्धा ३९, यवतमाळ ३६.८