पुणे : दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात या कालावधीत तापमानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढण्याची आणि गारव्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे. राज्यात मात्र कुठेही पाऊस होणार नसून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
ऑक्टोबरच्या २३ तारखेनंतर राज्याच्या सर्व भागातून पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात एकदमच घट झाली होती. ही घट सध्याही कायम असून, बहुतांश भागात रात्री गारवा जाणवतो आहे. सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे बहुतांश भागात थंडी जाणवते आहे. मात्र, दिवसा निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सर्वत्र ३० ते ३२ अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे हलका चटका जाणवतो आहे.
दक्षिणेकडे तमिळनाडू आणि जवळच्या राज्यांमध्ये सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. या भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. कमी दाबाच्या पट्टय़ांची निर्मिती झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून ७ नोव्हेंबपर्यंत तमिळनाडू, दक्षिण केरळ आदी भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तरेच्या बाजूला हिमालयीन विभागातही दोन ते तीन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. दक्षिणेकडील पावसाळी स्थितीचा परिणाम काही प्रमाणात राज्यावर जाणवणार आहे. संध्याकाळनंतर काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती राहून किमान तापमानात किंचित वाढ होऊन थंडी कमी होईल. दिवसा निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. मात्र राज्यात आठवडय़ात कुठेही पावसाची शक्यता नाही.
राज्यात पुणे सर्वात थंड
गुरुवारी (३ नोव्हेंबर) पुण्यात राज्यातील नीचांकी १३.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात ३० ऑक्टोबरलाही सर्वात नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापूर्वी औरंगाबादमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. मुंबई उपनगरांमध्येही किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घटला आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आदी भागांतही तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट होऊन १३ ते १५ अंशांवर तापमानाचा पारा आहे. दिवसाचे कमाल तापमान मुंबईसह कोकण आणि विदर्भात ३३ ते ३६ अंशांवर आहे. गुरुवारी अलिबाग येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.