शिरुर : शिरुर पोलीसांनी गोवा बनावटीची ६० लाख ३६ हजार रुपये किमंतीची अवैधरित्या विनापरवाना दारु व ही दारु घेवून जाणारा १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ७५ लाख रुपयांचा माल जप्त केला असून वाहनचालकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितले की, दिनांक १० मार्च २०२५ रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघेजण वाहतूक नियमन कार्य करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरूर गावाच्या हद्दीत बोऱ्हाडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असलेल्या भारत पेट्रोलपंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो एम. एच. ४८ सी. बी. ३६०५ हा उभा आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, निरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस पथकासह बोऱ्हाडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोलपंपासमोर जावून ट्रकचालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख, वय ३७ वर्ष, रा रूम नंबर ५/७ आझाद नगर झोपडपट्टी, वेस्ट मुंबई यास अटक केली. या गुन्ह्यामध्ये ६० लाख ४८ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू १५ लाख रुपये किंमतीचा टाटा कपंनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण ७५ लाख ४८ हजार रुपये माल जप्त करण्यात आला आहे. या बाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत.