पुणे : कात्रज चौकातील गर्दीतून जाण्यास मोटारीला वाट न दिल्याने मोटारचालकाने टेम्पोचालकाला गजाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मोटारचालकाने टेम्पोची तोडफोड करुन दहशत माजविली. या प्रकरणी मोटारचालकास पोलिसांनी अटक केली.
संदीप नरसिंग चव्हाण (वय २३, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चव्हाण याने केलेल्या मारहाणीत टेम्पोचालक आदिनाथ विश्वनाथ जाधव (वय ४५, रा. कांतीनी अपार्टमेंट, कोंढवा) जखमी झाले आहेत. जाधव यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक जाधव हे कात्रज चाैकातील सिग्नलला थांबले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीस वाट न मिळाल्याने मोटारचालक चव्हाणने टेम्पोचालक जाधव यांना शिवीगाळ केली.
हेही वाचा: पुणे: कोरेगाव पार्क, लोहगावमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक
त्यानंतर चव्हाणने मोटारीत ठेवलेल्या गजाने जाधव यांना बेदम मारहाण केली. टेम्पोचा वायपर तोडून जाधव यांना वायपरने मारहाण केली. चव्हाणने जाधव यांचे डोके तसेच डोळ्याच्या बाजूला गज मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी चव्हाणला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.