लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गुटखा विक्रीवर बंदी असताना बेकायदा गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. पोलिसांनी टेम्पोतून आठ लाक ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४, रा. थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम बाळकृष्ण निंबाळकर (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; येरवड्यात अपघात
राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थाची विक्री आणि वापरास बंदी घालण्यात आली आहे. गुटखा बंदी असताना शहरातील पानपट्ट्यांवर गुटखा विक्री होत आहे. शुक्रवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भापकर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळून आला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.
आणखी वाचा-सॅलिसबरी पार्कमधील सदनिकेतून ५० तोळ्यांचे दागिने चोरीला
दोघांनी शहरात गुटखा विक्री करण्यासाठी आणला होता. गुटखा कोठून आणला, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.