पिंपरी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. दिवाळीचा पगार न दिल्याने चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस चौकशीत झाला आहे. बसचालक जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. नर्‍हे आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा) सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत.

चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता.कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची समोर आले. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे.

आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे