पुणे :राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पवित्र प्रणालीमार्फत  नियमित शिक्षक भरतीतून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरुपात तात्पुरती नियुक्ती जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियुक्तीची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 नियोजित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरती प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे दिले. सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहील. नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करणे आवश्यक आहे.

नियुक्तीच्या कालावधीत शिक्षकीय पदाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अटी-शर्ती मान्य असल्याचे, करार पद्धतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत किंवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, या आशयाचे हमीपत्र घ्यावे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आवेदनपत्र अर्ज मागवून नियुक्ती आदेश द्यावेत. संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्या प्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary appointment of now retired teachers to vacant posts in zilla parishad schools pune print news ccp 14 ysh