शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत पाणीकपात न करता पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, मान्सून सक्रीय झाल्याने धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. त्यातच पाणीकपात ११ जुलै पर्यंतच असल्याने पाणीकपात जवळपास रद्द करण्यात आल्याचे संकेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.
शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दिवसाआ़ड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (४ जुलै) पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलैपर्यंत होणार होती. या कालावधीत पडणारा पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पाणी वितरण व्यवस्थेचे पुढील नियोजन करण्याचे प्रस्तावित होते. मात्र त्यापूर्वीच पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद यामुळे पूर्णवेळ पाणी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आठ जुलैपासून ११ जुलै पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत आणि पूर्ववत ठेवला जाणार आहे. त्यामुळे तूर्त पाणकपात मागे घेण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे केवळ गुरुवारीच काही भागाला पाणीपुरवठा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मान्सून सक्रीय झाला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून बरसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीसाठाही वाढत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे अकरा जुलैनंतरही पाणीकपात होण्याची शक्यता कमीच आहे.
सोमवारपासून शहराला दिवासाआड एकदा पाणी देण्याचे जाहीर केल्यानंतंर त्याचे वेळापत्रक महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र पहिल्या दिवशी ज्या भागाला पाणीपुरवठा होणार होता, त्या भागाला पाणीच मिळाले नाही. तर ज्या भागाला पाणीपुरवठा होणर नव्हता, त्या भागात पाणी मिळाले. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या. त्यातच धरणातील पाणीसाठाही वाढत असल्याने आता पाणीकपात नको, अशी भूमिकाच महापालिकेने घेतल्याचे दिसत आहे. तसे संकेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. अकरा जुलै नंतर पाणीकपातीबाबतचा निर्णय आयुक्त घेतली, असे सांगितले जात आहे. मात्र पाणीकपात रद्द झाल्याचे जवळपास स्पष्ट आहे.