पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ योजनेस प्रतिसाद देत राज्य सरकारने पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांसाठी ४ हजार ६०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे. त्यामध्ये पुण्यातील ‘सारा प्लास्ट’ या कंपनीच्या एक हजार शौचालयांचा समावेश असून, सेवा सहयोग संस्थेचे चार हजार स्वयंसेवक सहभागी होत आहेत.
डोक्यावर मैला वाहून नेण्यावर न्यायालयाने र्निबध घातले आहेत. या नावीन्यपूर्ण शौचालयांमुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणार असून, वारीमध्ये पंढरपूरची स्वच्छता ठेवण्यामध्ये योगदान देता येणे शक्य होणार असल्याची माहिती माजी खासदार प्रदीप रावत आणि सेवा सहयोग संस्थेचे प्रशासकीय संचालक शैलेश घाटपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदीप रावत हे स्वच्छ भारत योजनेचे प्रमुख आहेत.
सेवा सहयोग ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत योजने’स प्रतिसाद देत संस्थेने वारी काळात तुकाराममहाराज पालखी सोहळय़ात वारकऱ्यांसाठी शौचालयांची व्यवस्था केली. पालखीच्या लोणी आणि यवत येथील मुक्कामात (१२ ते १४ जुलै) प्रत्येक ठिकाणी दोनशे तात्पुरती शौचालये उभारली होती. तेथील गावकरी आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना शौचालये वापरण्यासाठी प्रवृत्त केले, असे घाटपांडे यांनी सांगितले.
रावत म्हणाले, आषाढी वारीसाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये ४ हजार ६०० तात्पुरती शौचालये उभारली आहेत. या व्यवस्थेचा वारकऱ्यांनी वापर करावा यासाठी संस्थेचे पुणे जिल्हय़ातील एक हजार आणि सोलापूर जिल्हय़ातील तीन हजार स्वयंसेवक प्रबोधन करणार आहेत. यामध्ये राजीव खेर आणि रणजित खेर यांच्या सारा प्लास्ट या कंपनीच्या एक हजार शौचालयांचा समावेश आहे. या प्रत्येक शौचालयाला २०० लीटरची टाकी आहे. लोणी आणि यवत येथील पालखी मुक्कामी जमा झालेला ६८ हजार लीटर मैला मलनिस्सारण केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. वारकऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती घडविणे आणि स्थानिक प्रशासनावरील ताण कमी करणे असा या उपक्रमाचा हेतू आहे. यंदाच्या पंढरपूर वारीतील अनुभवावर आधारित राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांसह पालखी मार्ग पाणंदमुक्त राहावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary toilets