सोमाटने टोल नाका हटाव कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला यश आले आहे. जोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारसोबत समितीची बैठक होत नाही, तोपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांना सोमाटने टोल नाक्यावर टोल आकारण्यात येणार नाही, असे आश्वासन स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आश्वासनानंतर सोमाटने टोल हटाव कृती समितीचे किशोर आवारे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिवेशन संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आवारे यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सोमाटने टोल नाका बंद होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्या तरी या टोल नाक्यावर वाहनांना टोल आकारला जाणार नाही. ‘आयआरबी’ने वाहनधारकांची अडवणूक केल्यास पुढील स्वरुपाला सामोरे जावे लागेल, त्याची जबाबदारी ‘आयआरबी’ची असेल असा इशारा किशोर आवारे यांनी दिला आहे.

हेही वाचा – पुणे : मित्रांशी शरीरसंबंध ठेवावे म्हणून मैत्रिणीला केली मारहाण; महिलेसह तिघांवर गुन्हा

गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोलनाका हटाव कृती समिती टोल नाका हटवण्यासाठी आक्रमक होती. सर्व सूत्र समितीचे किशोर आवारे यांनी हातात घेतल्यानंतर शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. याची दखल राज्यशासनाने घेऊन आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे सोमाटणे टोल नाक्यावर आले होते. दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सर्व उपोषणकर्ते उतरले होते. यामुळं महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. यावेळी किशोर आवारे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केले. तुमचा टोल नाक्याचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकार मार्गी लावतील. तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत. अधिवेशन सुरू असल्याने तुमच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊ शकत नाही. अधिवेशन संपताच सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती आणि शिंदे-फडणवीस यांची बैठक घेऊ. ही समस्या कशी दूर करता येईल याविषयी चर्चा करू. तोपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांवर टोल आकाराला जाणार नाही. असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. आयआरबीच्या अधिकाऱ्यांसमोरच हे सर्व स्पष्ट केल्यानंतर किशोर आवारे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडले आहे. परंतु, टोल नाका हटणार की नाही, हे येणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “कपिल सिब्बल यांच्याशी…”

आयआरबीने वाहनधारकांची अडवणूक केल्यास पुढील परिणाम..

आयआरबी अधिकाऱ्यांच्या समोर सार्वजनिक बांधकामंत्री यांनी ट्रान्सपोर्ट वाहतूक सोडून इतर वाहनांना टोलमधून सूट देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे पालन आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी केले नाही आणि सर्वसामान्य वाहनधारकांची अडवणूक केली तर आंदोलनाला वेगळं स्वरूप येईल, असा इशारा सोमाटने टोल नाका हटाव समितीचे किशोर आवारे यांनी दिला आहे. याला जबाबदार आयआरबी असेल, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary toll exemption from somatane toll on old pune mumbai highway kjp 91 ssb