पुणे : सीरमने कोविशिल्ड लशीचे उत्पादन डिसेंबर २०२१ मध्येच थांबवले. लशीच्या त्या वेळच्या साठ्यापैकी शंभर दशलक्ष लशी मुदतबाह्य ठरल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच लशीबाबत सार्वत्रिक उदासीनता असल्याने वर्धक मात्रेलाही मागणी नाही. लोकांना आणि मलाही आता करोना महासाथीचा कंटाळा आल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
‘डेव्हलपिंग कन्ट्रीज व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क’च्या (डीसीव्हीएमएन) पुण्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पूनावाला म्हणाले, की कोविशिल्डचे उत्पादन डिसेंबर २०२१ मध्ये थांबवले आहे. काही दशलक्ष लसमात्रांचा साठा त्या वेळी उपलब्ध होता. मात्र १०० दशलक्ष मात्रा या पूर्वीच मुदतबाह्य ठरल्या आहेत. कोव्होव्हॅक्स या लसीला पुढील दोन आठवड्यात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्धकमात्रेच्या मिश्रणाबाबत धोरणही जाहीर होऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास भारतीय नियामक संस्थांकडूनही मान्यता मिळेल. मात्र सध्या वर्धक मात्रांना अजिबात मागणी नाही. लस घेण्याबाबत सार्वत्रिक उदासीनता आहे. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास आता लोकांना करोना महासाथीचा कंटाळा आला आहे आणि मलाही कंटाळा आला आहे.
भविष्यात लोक जेव्हा दरवर्षी लस घेतील, तेव्हा त्यात कदाचित करोना प्रतिबंधक लस आणि अन्य लसी एकत्र असू शकतील. ते कदाचित स्वतंत्र उत्पादन असू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतात तापासाठी लस घेण्याची संस्कृती नाही. आम्ही २०११मध्ये स्वाइन फ्ल्यूच्या महासाथीवेळी लस आणली होती. मात्र कोणीही ती घेतली नाही. तापाची लोकांना भीती वाटत नाही. तसेच लोकांना लस घ्यायचीही नसते, असेही ते म्हणाले.