पुणे : Maharashtra Weather Forecast कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज असून, पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी वाऱ्यांचा पश्चिम – पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे.
वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्याच्या मधील क्षेत्र (शिओर झोन) दक्षिणेकडे सरकले आहे. ही स्थिती राज्यात मोसमी पाऊस पडण्यास अनुकून नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. अगदी किनारपट्टीवरही तुरळक सरी होतील. साधारणपणे ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवस कोरडे जातील. या दिवसात राज्यात फारसा पाऊस होणार नाही. मोसमी वाऱ्याचा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यामुळे मोसमी पाऊस पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
राज्यात दोन दिवस हलक्या सरी
राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. शनिवारी कोकण किनारपट्टी, सातारा, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्टमधील पावसाच्या खंडाची कारणे काय?
- मोसमी वाऱ्यांचा पश्चिम – पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला
- दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी
- वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्यामधील क्षेत्र (शिओर झोन) दक्षिणेकडे सरकले
- बंगालच्या उपसागरात ढग नसणे
- एल-निनो सक्रिय; पण त्याचा मोसमी पावसावर परिणाम नाही
- इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत