पुणे : गंभीर गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित करण्यासाठी आता पोलीस दलात दहा ‘आयबाइक’(इन्व्हिस्टिगेशन बाइक) दाखल झाल्या आहेत. तातडीने घटनास्थळी जाऊन पुरावे कसे गोळा करायचे, याचे प्रशिक्षण न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून देण्यात येत असून, आतापर्यंत २० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
गंभीर गुन्हे घडल्यानंतर पुरावे संकलित करण्यासाठी पोलिसांकडे आयकार उपलब्ध आहेत. आयकारमध्ये पुरावे संकलित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलातील प्रत्येक परिमंडळात आयबाइक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीतून आयकार पोहोचण्यास विलंब होत असल्याने आयबाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्यात पुणे पोलिसांना दहा आयबाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून २० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील पाच परिमंडळात दोन आयबाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवसा आणि रात्रपाळीत आयबाइकवर प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. संबंधित पोलीस कर्मचारी प्रत्येक परिमंडळातील पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने पुरावे संकलित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – पुणे : अल्पवयीनाकडून मद्याच्या नशेत वाहनांची तोडफोड, महर्षीनगर भागातील घटना
हेही वाचा – आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने मोशीत तरुणाचा खून, मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली
कामकाज कसे चालणार?
शहरातील पाच परिमंडळात दहा आयबाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी आणि रात्री दोन पोलीस कर्मचारी आयबाइकवर तैनात राहणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना वाॅकीटाॅकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची नोंद करून (स्टेशन डायरी) पोलीस कर्मचारी आयबाइकवरून घटनास्थळी पोहोचणार आहेत. कामकाजाचा अहवाल पोलीस उपायुक्तांना सादर करावा लागणार आहे. भारतीय न्याय संहितेनुसार ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे. अशा ठिकाणी आयबाइकवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने पोहोचणे बंधनकारक आहे. शास्त्रीय पद्धतीने पुरावे संकलित केल्यास न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल, तसेच आरोपींना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.