पुणे : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. मतदान २२ नोव्हेंबरला, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होऊन लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे.

अ-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघातून मुंबई-कोकण विभागातून सिद्धार्थ कांबळे, पुणे विभागातून दिगंबर दुर्गाडे, नाशिक विभागातून गुलाबराव देवकर, औरंगाबाद विभागातून अर्जुनराव गाढे आणि अमरावती विभागातून वसंत घुईखेडकर बिनविरोध निवडून आले आहेत. ब-नागरी सहकारी बँक मतदारसंघातून पुणे विभागातून सुभाष जोशी आणि भाऊ कड, नागपूर विभागातून रवींद्र दुरगकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संजय भेंडे, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विश्वास ठाकूर बिनविरोध झाले आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे पीएमपीएमएलच्या बस चालकाला बेदम मारहाण

असोसिएशनच्या संचालक मंडळात मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागातून अ-जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहा प्रतिनिधी असतात. त्यापैकी मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, तर नागपूर विभागातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. ब-नागरी सहकारी बँकांचे मुंबई व कोकण विभाग, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून प्रत्येकी दोन, तर नागपूर आणि अमरावती विभागातून प्रत्येकी एक प्रतिनिधी संचालक असतो. त्यापैकी पुणे विभागातील दोन, तर नागपूर विभागातील एक संचालक बिनविरोध झाले आहेत.

हेही वाचा : पुणे महापालिकेच्या कागदपत्र पडताळणीकडे उमेदवारांची पाठ

महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत, तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.असोसिएशनकडून गुंतवणूक, वसुली आणि विविध कायदे, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा व्यवस्थापन, समाजमाध्यमांतून विपणन, बँकिंग नियमन कायद्यातील बदलामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर होणारे परिणाम, मानवी संसाधने आदी विषयांवर राज्यातील जिल्हा व नागरी बँकांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच शिक्षण, सल्ला, डिजिटल पेमेंट्स, संशोधन व नियोजन, धोरण, जाहिरात व प्रसिद्धी अशा विविध सेवा बँकिंग क्षेत्रातील संस्थांना दिल्या जातात. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत सातपुते काम पाहत आहेत.

Story img Loader