पुणे : लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लग्नसमारंभात सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी असते. सभागृहांमध्ये, घरात फुलांची सजावट करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे फुलांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. फुलांची मागणी वाढल्याचा परिणाम दरावरही झाला आहे. फुलांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सजावटीसाठी फुले खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर थोडासा ताण पडणार असल्याचे दिसून येत आहे.
फुलांमध्ये प्रति किलो झेंडूचा दर ३० ते ५० रुपये, गुलछडीचा दर ६० ते १०० रुपये, अस्टरची जुडी २० ते ३० रुपये, अस्टर सुट्टा १०० ते १५० रुपये किलो, कापरीचा दर २० ते ४० रुपये, शेवंतीचा दर ८० ते १०० रुपये, गुलाबगड्डीचा दर १० ते ३० रुपये, डच गुलाबाचा दर ७० ते १५० रुपये असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.