पुणे : यंदा पाऊस कमी झाल्याने जिल्हा प्रशासन, भूजल सर्वेक्षण विकास प्राधिकरण (ग्राउंड वॉटर सर्वेज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी – जीएसडीए) आणि कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या दुष्काळ आढाव्याच्या प्राथमिक अहवालात पुणे जिल्ह्य़ातील दहा तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळ घोषित करण्यासाठी देशातील विविध राज्यांनी व्यक्त केलेली मते विचारात घेऊन दुष्काळ मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार सामान्य, मध्यम आणि गंभीर दुष्काळ असे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्यात आली असून या समितीकडून तीन टप्प्यांमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यातील प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्य़ातील हवेली, मुळशी, वेल्हा, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि पुरंदर असे दहा तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी मंगळवारी दिली.

जिल्ह्य़ातील दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे समोर आले. या दहा तालुक्यांतील पिकांचे मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. पिकांचे नुकसान ३३ टक्यांपेक्षा जास्त असल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ, तर ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त प्रमाण असल्यास गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील खेड, जुन्नर आणि मावळ या तीनच तालुक्यांमध्ये समाधानकारक स्थिती असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुष्काळसदृश तालुक्यांतील गावांपैकी यादृच्छिक पद्धतीने दहा टक्के गावे निवडणार

निवडलेल्या गावांतील प्रत्येक प्रमुख पिकासाठी पाच ठिकाणे निवडून पिकांचे सर्वेक्षण व माहिती संकलित होणार

मोबाइल अ‍ॅपचा वापर करून सर्वेक्षण होणार; त्यावरून पिकांची छायाचित्रे घेणार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten talukas of pune district are drought affected
Show comments