लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या शनिवारी (३० सप्टेंबर) जप्त केले. ससून रुग्णालयात उपचार घेणारा ललित पाटीलला अमली पदार्थ देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ललित पाटील सोमवारी (२ ऑक्टोबर) ससून रुग्णालयाच्या उपचार कक्षातील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील, त्याचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक पसार झाल्यानंतर त्यांचा विशेष पथकाकडून शोध घेण्यात येत होता. भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक यांना नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली.

आणखी वाचा-पालकमंत्री पवारांच्या शनिवारच्या दौऱ्याबाबत गोपनियता

ललित पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एककडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार ललित पाटील पसार झाला आहे. पाटील याला मोटारीतून पिंपरी-चिंचवड शहरातील रावेतपर्यंत सोडणारा मोटारचालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने पाटीलचा साथीदार अभिषेक याच्या नाशिकमधील घरावर छापा टाकून तीन किलो सोने जप्त केले आहे. अमली पदार्थ विक्रीतून पाटील, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक यांनी सोने, तसेच जमीन खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी पाटील याच्या नाशिकमधील शिंदे गावातील कारखान्यात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने तपास गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten teams to search for drug smuggler lalit patil assistant commissioner of police sunil tambe is incharge of investigation pune print news rbk 25 mrj
Show comments