पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूकपूर्व प्रचार शिगेला पोहचला आहे. नववर्षांची संधी साधत इच्छुकांनी केलेले आणि न केलेले समाजकार्य दिनदर्शिकांवर छापले असून या दिनदर्शिका सध्या घरोघरी पोहोचवल्या जात आहेत. या दिनदर्शिका घेण्याची इच्छा असो वा नसो वाटपाचे काम दिलेल्या कामगारांकडून त्या प्रत्येक घरी वाटल्या जात आहेत. त्यामुळे घरोघरी किमान दहा-पंधरा दिनदर्शिका आणि इच्छुकांच्या परिचय पत्रांचा खच झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागाची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे. परिचय पत्रकांशिवाय समाज माध्यमांचा वापर खुबीने करण्यात इच्छुक अघाडीवर आहेत. एकाच पक्षातील अनेक इच्छुक असतील तर या सर्वानी मिळून दिनदर्शिका छापताना त्यावर पक्षातील सर्वाच्या छबी छापून त्या दिनदर्शिका वितरीत करण्यात येत आहेत. त्या पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नववर्षांची संधी साधत दिनदर्शिकांच्या माध्यमातून स्वत:ची छबी पोहोचविण्याची धडपड इच्छुकांकडून केली जात आहे.
घरी कोणी असो वा नसो दिनदर्शिका वितरित करण्यासाठी नेमलेल्या कामगारांकडून घराचा दरवाजा बंद असला तरी तिथेच दिनदर्शिका फेकून पुढे जात दिवसाची हजेरी लावली जात आहे.
सध्या होत असलेले पक्षांतर लक्षात घेऊन अनेक इच्छुकांनी पक्षाचे नाव किंवा पक्षाचे चिन्ह न छापता आपणच कसे खरे समाजसेवक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्नही दिनदर्शिकांच्या माध्यमातून केला आहे. आजपर्यंत नाव आणि चेहरा न पाहिलेले समाजसेवकही निवडणुकीसाठी इच्छुक होऊन दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रकटले आहेत. त्यामुळे कुतूहलाने दिनदर्शिका चाळताना मतदारांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचेही भाव उमटत आहेत. चार
सदस्यीय प्रभाग असल्यामुळे उमेदवरीच्या आशेने सर्वपक्षीय मिळून ३० ते ४० इच्छुक सध्या प्रत्येक प्रभागात आहेत. त्यातील १० ते १५ इच्छुकांकडून दिनदर्शिका छापून त्या वितरीत केल्या जात आहेत.