पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्याला दहा वर्षांच्या नातीने हाताने मारून पळवून लावल्याची घटना घडली आहे. चोराला पळवून लावणार्या ऋत्वी घाग हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दररोज चार ते पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. अशीच घटना शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये घडली. येथे राहणार्या लता घाग या आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी २५ ते ३० वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. त्यावर आजी पत्ता सांगत असताना चोरट्याने आजूबाजूला पाहत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – पुणे: घरकाम जमत नसल्याने सासूकडून सुनेचा खून, लोहगाव भागातील घटना
हेही वाचा – पुणे: इंद्रायणीत सांडपाणी सोडू नका, अन्यथा… देहू संस्थानचा इशारा
आजीने चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केल्यावर आजीपासून पाच फुटांच्या अंतरावर असलेल्या दहा वर्षीय ऋत्वी घाग हिने धावत जात त्या चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. तर आजीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने हिसका देऊन तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.