पुणे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महामंडळाच्या मुख्यालयाकडून ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवासस्थानी रात्रीच्या मुक्कामासाठी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून कर्मचाऱ्यांची वानवा ही प्रमुख कारणे असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. सन २०२१ पासून निवासस्थानाचे उद्घाटन झाल्यापासून ते बंदच आहे.
पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये सन २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोसिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्यादेखील साध्या होत्या. यापूर्वी हा बंगला भाडेतत्त्वावर दिला होता. सन २०२१ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासाची कामे महामंडळाने केली आहेत. या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच दोन सुट, एक व्हीआयपी सुट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सुट, व्हीआयपी सुट वातानुकूलित केला आहे. सुटमध्ये आकर्षक सिलींग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवास (डॉरमेटरी) आहेत. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहू शकतात.
हेही वाचा >>>पुणे: ऑनलाइन भाडेकराराचे दस्त नोंदविण्यात पुन्हा अडचणी
दरम्यान, सिंहगड येथील निवासस्थानाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. एमटीडीसी पुणे विभागाकडून मात्र, पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे बरेच दिवस हे निवासस्थान सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, सिंहगड हा शहरापासून जवळच आहे. परिणामी गडावरील महामंडळाच्या निवासस्थानी रात्री मुक्काम करण्यास पर्यटक अनुत्सुक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महामंडळाच्या तुटपुंज्या वेतनामुळे या ठिकाणी काम करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे हे निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा एकदा महामंडळाच्या मुख्यालयाकडून निविदा काढण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: कोकणासाठी रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या
उन्हाळी सुट्यांसाठी महामंडळाच्या पुणे विभागातील निवासस्थानांमध्ये ८० ते ९० टक्के आरक्षण झाले आहे. सिंहगडावरील निवासस्थानी रात्री मुक्कामाला पर्यटक उत्सुक नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचारी मिळत नाहीत. या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि येत आहेत. मात्र, समांतर पातळीवर सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्याबाबत मुख्य कार्यालयाकडून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.- मौसमी कोसे, एमटीडीसी पुणे विभाग, प्रादेशिक व्यवस्थापक