शहरातील ४२ रस्ते खासगी विकसकांकडून तयार करून घेण्याची योजना रद्द करण्याची नामुष्की अखेर महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. रस्त्यांसाठी आलेल्या निविदा २५ ते ३० टक्के जादा दराने आल्यामुळे या योजनेत महापालिकेचा शेकडो कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याच्या हरकती नगरसेवकांनी सातत्याने घेतल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, असा स्पष्ट अहवाल आता निविदा समितीनेही दिला आहे.
उपनगरांमध्ये तसेच समाविष्ट गावांमध्ये ६४ किलोमीटर लांबीचे ४२ रस्ते खासगी लोकसहभागातून (पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन- पीपीपी) विकसित करून घेण्याची योजना महापालिकेने आखली होती. मुळातच, हे रस्ते फक्त बिल्डरच्या फायद्याचे असून त्यांच्या नव्या बांधकाम योजनांनाच त्याचा फायदा होणार असल्यामुळे ही योजना फक्त हितसंबंधीयांच्या लाभासाठीच आखण्यात आल्याची हरकत नगरसेवक आबा बागूल यांनी सर्वप्रथम घेतली होती. मात्र, पथ विभागाने त्याकडे लक्ष न देता निविदा प्रक्रिया केली. त्यानंतर नगरसेवक संजय बालगुडे यांनीही या निविदा प्रक्रियेत महापालिकेचे फार मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याची हरकत घेऊन ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.
योजनेतील सात रस्त्यांसाठी प्रत्येकी तीन निविदा आल्या असून त्या प्रचलित बाजारभावापेक्षा सरासरी १५ ते २० टक्के जादा दराने आल्या आहेत. रस्त्यांच्या कामांसाठी सध्या अंदाजित रकमेपेक्षा १५ ते २० टक्के कमी दराच्या निविदा येत असताना या निविदा मात्र जादा दराने आल्या. म्हणजेच या निविदा सरासरी ३० टक्के जादा दराच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निविदा प्रक्रियेला गेल्या आठवडय़ात काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेता वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनीही लेखी हरकत घेतली होती. दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने या संपूर्ण प्रक्रियेबाबत तज्ज्ञ सल्लागारांचे स्पष्ट मत मागवले होते. तज्ज्ञ सल्लागारांनी तसेच निविदा समितीनेही ही प्रक्रिया रद्द करावी असे स्पष्टपणे आपापल्या अहवालात म्हटले आहे. या निविदांमुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर विपरीत परिणाम होईल, असेही निविदा समितीने म्हटले आहे.
प्रशासनाचे अभिनंदन- बालगुडे
प्रशासनाकडे जो अहवाल सादर झाला आहे त्यानुसार ही प्रक्रिया रद्द होणार असून त्यामुळे खासगी तत्त्वावर रस्ते विकसित करून घेतल्यामुळे जे नुकसान होणार होते ते आता थांबणार आहे. या निर्णयाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया नगरसेवक संजय बालगुडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा