गरवारे बालभवन हा उपक्रम खुल्या निविदा काढून चालवण्यास देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून हा प्रकल्प यापुढे संबंधित संस्था आणि महापालिका यांच्या वतीने संयुक्त रीत्या चालवला जाईल. तसेच या निविदा प्रक्रियेत सध्याच्या ॐ चॅरिटेबल ट्रस्टला प्राधान्य देण्यात येईल.
स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतर्फे गरवारे बालभवन ही वास्तू मुला-मुलींच्या सर्वागीण विकासासाठी बांधण्यात आली असून आतापर्यंत ॐ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरवारे बालभवन चालवले जात होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २००८ मध्ये महापालिकेने जागावाटप नियमावली तयार केली असून महापालिकेची कोणतीही वास्तू निविदा प्रक्रिया राबवूनच भाडे तत्त्वावर देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार गरवारे बालभवनसाठीही आता महापालिका निविदा प्रक्रिया राबवणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
या निविदा प्रक्रियेत सध्याच्या ट्रस्टलाही भाग घेता येईल. तसेच ज्या निविदा धारकाने सर्वाधिक दर देऊ केला असेल, तेवढी रक्कम ॐ ट्रस्टने देण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना गरवारे बालभवन चालवायला देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. त्याबाबत संबंधितांशी चर्चा झाली असून त्यांनीही या प्रक्रियेला मान्यता दिली आहे, असेही तांबे म्हणाले. गरवारे बालभवन चालवण्यासाठी पुढे येणारी संस्था आणि महापालिका यांच्या वतीने संयुक्त रीत्या यापुढे हा प्रकल्प राबवावा, असाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेची समिती स्थापन केली जाणार असून त्यात महापौर आणि आयुक्त हे सदस्य असतील.