लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षांच्या मुलीचा गळा कापून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. या खूनामुळे पुकारण्यात आलेल्या ‘लोणावळा बंद’ला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर संतप्त जमावाकडून कुमार रिसॉर्ट या हॉटेलची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
ही मुलगी विवाह समारंभानंतर बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनंतर, मंगळवारी तिचा मृतदेह रिसॉर्टच्या टेरेसवर आढळून आला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार रिसॉर्टमध्ये रविवारी रायगड जिल्ह्यातील कुटुंबीयांचा विवाह होता. संबंधित मुलीचे वडील हे विवाह असलेल्या व्यक्तीकडे नोकरीला आहेत. त्यामुळे तेही कुटुंबासह या विवाहासाठी आले होते. दुपारी विवाह झाल्यानंतर रात्री सर्वजण जेवणासाठी गेले. मुलीच्या आईने तिला जेवण आणून दिले. स्वतःसाठी जेवण आणण्यासाठी त्या गेल्या. परत आल्यानंतर त्यांची मुलगी त्यांना सापडली नाही. या रिसॉर्टमध्ये सर्वत्र तिचा शोध घेण्यात आला. त्यानंतर तात्काळ पोलीसांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

Story img Loader