दहावी, बारावीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षेचे ‘टेन्शन’ आले म्हणून समुपदेशकांकडील गर्दी वाढत आहे, पण ती विद्यार्थ्यांची नाही, तर पालकांची! समुपदेशानासाठी येणाऱ्यांमध्ये साधारण चाळीस टक्के प्रमाण हे पालकांचे आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांचा विद्यार्थ्यांना ताण येऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देतात. परीक्षा घेणाऱ्या राज्यमंडळाकडून आणि प्रत्येक विभागीय मंडळाकडूनही विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये समुपदेशनासाठी प्रतिसाद वाढत असल्याचे समुपदेशक सांगत आहेत. मात्र, वाढणारा प्रतिसाद हा पालकांचा असल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदवले आहे. ‘मुलगा अभ्यासच करत नाही.. इंग्रजीत कच्चा आहे, कमी वेळात विषय कसा पक्का होईल.. परीक्षा असूनही मुलगा टीव्ही पाहतो.. मुलगा रात्री लवकर झोपत नाही.. मुलाला किमान अमुक टक्के मिळण्यासाठी काय करू.. परीक्षेच्या काळात योगा करावा का.. परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून काही टॉनिक आहे का..’ इथपासून ते मुलाला आजचा पेपर कठीण गेला आहे, तो जीवाचे काही बरे-वाईट करून घेईल का, अशा पालकांच्या प्रश्नांच्या फैरींना समुपदेशक तोंड देत आहेत.
इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र या विषयांचा बागुलबुवा विद्यार्थ्यांइतकाच पालकांनाही वाटत आहे. या विषयांच्या परीक्षेदरम्यान ‘परीक्षेचे टेन्शन’ आहे म्हणून अधिक कॉल येत असल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदवले आहे. समुपदेशनासाठी येणाऱ्या कॉल्सपैकी जवळपास चाळीस टक्के कॉल्स हे पालकांचे असल्याचे समुपदेशक सांगतात. समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद आहे. पण विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या कॉल्सपैकीही बहुतेक कॉल्स हे ‘आई-वडील ओरडतात’, ‘मला पेपर कठीण गेला, घरी सांगण्याची भीती वाटते,’ अशा प्रकारचे आहेत.

गेली चार वर्षे राज्यमंडळाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकास संस्थेतील समुपदेशक पवनकुमार गायकवाड यांनी सांगितले, ‘‘ विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थी ताणाला सामोरे जात आहेत. मात्र, बहुतेक वेळा पालकांच्या अवास्तव अपेक्षा असल्याचे लक्षात येते. पालकांकडून विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आल्यामुळेही समुपदेशकांकडे येणारे विद्यार्थी आहेत. पालक स्वत: मुलांच्या परीक्षांच्या बाबतीत ताणवाखाली असतात. पालकांकडूनही मुलांच्या परीक्षांचे टेन्शन आले म्हणून फोन येतात. अशावेळी मुलांना बोलू दे असे पालकांना सांगावे लागते.’’
 
पहाटे ४ वाजता कॉल. आणि सोप्पा गेलेला पेपर
तिने भौतिकशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी पहाटे चार वाजता समुपदेशकांना फोन केला. तिच्या घरात काही अडचणी होत्या, पालकांकडून परीक्षेचे खूप दडपण होते आणि त्यामुळे तिचा परीक्षा देण्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. ‘माझा अभ्यासच झालेला नाही. परीक्षा देताना काही आठवेल की नाही याची भीती वाटते. मी नापास झाले तर. मला जगायचेच नाहीये.’ असे रडत रडत ती फोनवर सांगत होती. तिच्याशी बोलताना यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समुपदेशकांच्या लक्षात आले. समुपदेशकांनी तिच्याशी जवळपास तासभर गप्पा मारल्यानंतर ती सावरली. तिने भौतिकशास्त्राची परीक्षाही दिली आणि समुपदेशकांना फोन करून पेपर सोपा गेल्याचेही आवर्जून सांगितले.