आज मानसिक आरोग्य दिवस : कार्यालयीन ताण-तणावावर उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामकाजाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, त्यातून उद्भवणारे ताण-तणाव आणि त्यातून वाढीस लागणारे नकारात्मक वातावरण यातून कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचे थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमेतवर आणि मानसिक आरोग्यावर होत असून कामाच्या ठिकाणी असलेल्या ताण-तणावांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

दहा ऑक्टोबर हा दिवस जगभरात मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा होतो. यंदा कार्यालयीन ठिकाणचे मानसिक आरोग्य या संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेकडून घेण्यात आला आहे.

कामाच्या ठिकाणी प्रचंड स्पर्धा आहे. इतकेच नाही तर कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी करावा लागणारा प्रवास, त्यासाठी होणारी दगदग या गोष्टींचा ताण आपल्यावर आणि आपल्या अनेक सहकाऱ्यांवर असल्याची माहिती पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या संगणक अभियंत्याने दिली. कामाच्या ठिकाणी घालवलेला वेळ, त्या बदल्यात मिळणारा तुटपुंजा मोबदला हेही अनेकांच्या नैराश्याचे कारण असल्याचे त्याने सांगितले. कामाच्या ठिकाणी असलेला तणाव, राजकारण यांमधून नैराश्य येते. त्यातून व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांची तारेवरची कसरत होते, स्वभावात चिडचिडेपणा येतो अशी लक्षणे बिझनेस अ‍ॅनलिस्ट म्हणून काम करणाऱ्या तीस वर्षीय तरुणीने सांगितली. त्यातून सुटका करण्यासाठी घरी आल्यावर किंवा जेवणाच्या, चहाच्या ब्रेकमध्ये कामाचे विषय न बोलण्याचे पथ्य पाळत असल्याचेही तिने सांगितले. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना अनेक लहान मोठे ताण-तणाव आहेत. त्यातून सहनशक्ती कमी होणे किंवा सतत नैराश्य, झोप न लागणे, जेवणाच्या वेळा सांभाळू न शकणे असे त्रास होतात. त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न भेडसावतात असे अभियंता म्हणून काम करणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणीने सांगितले. परदेशी कंपनी किंवा परदेशी व्यवस्थापन असेल, तर कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य, कामाच्या ठिकाणचे वातावरण याचा विचार होतो. पण भारतीय कंपन्यांमध्ये अजूनही या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत असा अनुभवही तिने सांगितला.

मानसिक आरोग्याच्या प्रश्नांमधून व्यसनाधीनतेला सुरुवात होत असल्याचे निरीक्षण पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या डॉ. स्मिता पानसे यांनी नोंदवले. शारीरिक आजारांबद्दल बोलले जाते. त्याच मोकळेपणाने मानसिक आजारांबद्दल बोलले जावे, नैराश्य किंवा मानसिक आजाराची लक्षणे जाणवलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या.

कामकाजाच्या ठिकाणी असणारे ताण-तणाव हा जसा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा घटक आहे तसा समाजाचा दृष्टिकोनही त्रासदायक ठरतो. कोण कुठे काम करतो आणि त्याला किती वेतन मिळते यावर त्याला समाजात मिळणारा मान ठरतो. कर्मचाऱ्यांना कुवतीपेक्षा कमी वा कुवतीपेक्षा जास्त काम देणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरते. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घ्या

* काम करण्यासाठी, तक्रारी, ताण-तणाव यांची चर्चा करण्यासाठी सकारात्मक वातावरण ठेवा

*  आपल्याला भेडसावणारे प्रश्न बोलून दाखवता येतील याचा विश्वास कर्मचाऱ्यांना द्या

*  मानसिक त्रासांवर औषधोपचार करणे गैर नाही, ही जागृती करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tensions at work hit performance of employees