लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या वतीने सांगवी ते बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी ४२ कोटींचा खर्च करण्यात आला असताना त्याच पुलासाठी २० कोटी रुपयांच्या खर्चाची नवी निविदा काढण्यात आली आहे. पुलावरील कमान, आकर्षक रचनेतील सजावटीसाठी निविदा काढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरास जोडणाऱ्या सांगवीजवळील स्पायसर महाविद्यालय येथील अरुंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या एकपदरी पुलावार वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यासाठी सांगवीतील दत्त आश्रम मठ ते बोपोडीतील चंद्रमणी नगर असा असा पूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पूल ७६० मीटर लांबीचा असून दोन पदरी आहे. त्यांची रुंदी १८.६० मीटर आहे. सांगवीच्या बाजूने ८० मीटर आणि पुण्याच्या बाजूस ५५५ मीटरचा पोहोच रस्ता आहे. पुलासाठी ४१ कोटी ६३ लाख खर्चास स्थायी समितीने ११ सप्टेंबर २०२१ रोजी मंजुरी दिली होती. त्यातील निम्मा खर्च पुणे महापालिका देणार आहे. पुलाचे काम टी अँड टी कंपनी करीत आहे.
आणखी वाचा-राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
कामाची मुदत दोन वर्षे होती. काम पूर्ण करून पूल वाहतुकीस जानेवारी २०२४ ला सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, पुण्याकडील कृषी महाविद्यालयाची जागा उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले होते. अखेर ती जागा उपलब्ध झाल्याने काम अंतिम टप्प्यात आले. हा पुल पावसाळ्यापूर्वी तयार होईल, असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काम पूर्णात्वाकडे असताना प्रशासनाने या पुलासाठी आणखी एक निविदा प्रसिद्ध केली आहे. स्थापत्य प्रकल्प विभागाने १९ कोटी ६३ लाख ५६ हजार ३९६ रुपये खर्चाची निविदा नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पुलाची पूर्वी निविदा प्रसिद्ध झालेली असताना त्याच कामासाठी नव्याने निविदा राबवून खर्च केला जात असल्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. सजावटीवर २० कोटींची उधळण केली जाणार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
सांगवी-बोपोडी पुलावरील कमान, आकर्षक रचनेत सजावट आणि अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी १९ कोटी ६३ लाख खर्चाची नवीन निविदा काढली असल्याचे कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले.