सरस्वतीपुत्र ग. दि. माडगूळकर यांचे एक सुरेख गीत आहे- ते माझे घर, ते माझे घर, जगावेगळे असेल सुंदर.. नक्षीदार अती दार तयाचे, अंगणी कमलाकृती कारंजे.. एकोणीसशे चोपन्न सालच्या ‘पोस्टातली मुलगी’ या चित्रपटातील हे गीत आजही प्रत्येक स्त्रीच्या मनातले घराचे स्वप्न रेखाटते.
घराभोवतीच्या बागेत एखादे सुंदर कारंजे बागेची शोभा वाढवते. वृंदावन गार्डनसारख्या सुप्रसिद्ध बागांमध्ये नयनमनोहर कारंजी, झुळझुळणारे पाणी हेच आकर्षण असते. पूर्वीच्या बंगल्यांमध्ये पुष्करणी असे. अनेक गृहसंकुलांमध्ये बागेत कारंजी अथवा छोटेसे तळे करतात. या जलाशयामुळे हवेत गारवा निर्माण होतो.
उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी अनेक जण कुलर आणतात. आमच्या घरात कुलरच्या तत्त्वावर पण झाडे असलेला ‘ग्रीन कुलर’ करायचा, असे सुनील भिडे यांनी ठरवले व अमलातही आणले. यासाठी २ फूट बाय २ फूट व दहा इंच उंच अशी सिमेंटची बिन भोकांची कुंडी, प्रनिप्रचे जोगळेकर यांचेकडून करून घेतली. वर्धिष्णू इंजिनिअरिंगच्या विकास पानसे यांनी सुनील भिडे यांनी दिलेल्या डिझाइननुसार फॅब्रिकेटेड स्टँड करून दिला. या स्टँडवर एकावर एक बसतील अशा लोखंडी जाळीच्या तीन गोलाकार कुंडय़ा करून घेतल्या. नारळाच्या शेंडय़ा तीन दिवस भिजत टाकून त्याचे निघालेले पाणी टाकून दिले व या भिजलेल्या शेंडय़ा, सेंद्रिय माती व पालापाचोळा जाळीच्या कुंडय़ांमध्ये दाबून बसवल्या. मोठय़ा सिमेंटच्या कुंडीत फॅब्रिकेटेड स्टँड उभा केला. या स्टँडमध्ये जाळीच्या कुंडय़ा बसवल्या. ही झाली कोरडी तयारी. मग एअर कुलरसाठीचा छोटासा सबमर्सिबल पंप आणला. त्याची किंमत अंदाजे ८०० रुपये होती. त्यास प्लास्टिक जाळीने गुंडाळून तो सिमेंटच्या कुंडीत ठेवला. कारण कुलर म्हटला, की विजेचा पंप हवाच. पंपाचा पाइप जाळीच्या कुंडय़ामधून एकदम वर घेतला व त्याला छोटय़ा मशरूम कारंजाची तोटी बसवली. ही सर्व तयारी झाल्यावर शेंडय़ा भरलेल्या जाळीच्या कुंडय़ांमध्ये बाहेरून एस्परेगस, फर्न, मिंट, स्पायडर प्लँट, बालसमची छोटी छोटी रोपं लावली. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यावर सिमेंटच्या कुंडीत पाणी भरले. त्यात गप्पी मासे सोडले. आता बटन चालू केले की पाणी पंपाने वर खेचले जाते व सर्वात वरच्या जाळीच्या कुंडीत छोटेसे मशरुम कारंजे उडते. झाडांना पाणी मिळते. झाडांवरून व नारळाच्या शेंडय़ांमधून झरझर झिरपणारे पाणी परत कुंडीत पडते. पाण्यात गप्पी मासे असल्यामुळे खतयुक्त पाणी झाडांना मिळते व झाडांमुळे पोषक पाणी माशांना मिळते. पाणी वरून खाली झिरपताना त्यात प्राणवायू मिसळतो. मुळांमुळे व शेंडय़ांमुळे पाणी स्वच्छ होते. पाण्यास वास येत नाही. झाडे खूश व मासेही खूश, असे हे सुंदर निसर्गचक्र तयार झाले आहे. या ग्रीन कुलरमध्ये पाणी व सावली आवडणाऱ्या छोटय़ा वनस्पती शोभतात. पिलिया, खुफिया किंवा पिटुनिया, बेगोनिया, बाल्सम अशा फुलांची रोपं लावता येतात. छोटय़ा पानांची, खाली पडायला आवडणाऱ्या वनस्पतींची निवड करावी. पाणी आवडणारे लेटय़ुस, पुदिना, आलूसुद्धा यात छान वाढते. हा ग्रीन कुलर चालू केला की पानांवरून निथळणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा टपटप आवाज छान वाटतो व बाल्कनी, दिवाणखाना जिवंत होतो. ग्रीन कुलर छोटय़ा जागेत करता येतो. ऑफिसमध्ये छोटय़ा गच्चीत ठेवता येतो. पाण्याचा पुनर्वापर होतो व पाण्याची बचत होते. झाडांना रोज पाणी घालावे लागत नाही. बटण चालू केले, की पाणी मिळते. सर्वात महत्त्वाचे झाडांमुळे व पाण्यामुळे खोलीचे तापमान निवळते.
मोठी गच्ची वा आवार असेल तर नैसर्गिक दगडांचा, फायबरच्या दगडांचा कृत्रिम धबधबा करता येतो. मातीमध्ये खड्डा करून किंवा गच्चीत विटा लावून शेततळ्याचा कागद घालून छोटेसे तळे करता येते. आजूबाजूला शोभिवंत गड लावून त्याच्यामध्ये बांबू ग्रास, फर्नस, अंब्रेला पाम, हेलिकोनिया अशी रोपं लावून सुंदर सजावट करता येते. टेराकोटाची कासवे, बदके शोभा वाढवतात. एखादे पुस्तक घेऊन पाण्यात पाय सोडून बसता येते. त्यासाठी घडीव दगड, जांभा वापरता येतो.
हे शक्य नसेल तर तांब्याची, संगमरवराची पसरट थाळी, घंगाळी घेऊन त्यात पाणी भरून पाण्यात घरच्या गुलाबाच्या पाकळ्या, मदनबाण मोगरा टाका. हवेतली गर्मी निवळेल. मंगल, चैतन्यदायी वातावरणनिर्मिती होईल. जलतत्त्व हे मूलतत्त्व आहे. त्याला घरात, बागेत स्थान हवेच. दगडावरून खळाळणारा धबधबा, ग्रीन कुलरमधले निथळणारे पाण्याचे थेंब, वाऱ्याच्या झुळकीने छोटय़ाशा तळ्यात उठणारे तरंग पाहूनच तनामनाची काहिली शांत होते. जीवनात आणखी काय हवं?
(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)