टाकाऊपासून टिकाऊचा संदेश देत वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावर फळबाग, फुलबाग फुलविण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करत आचरणातून आदर्श निर्माण केला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले प्लॅस्टिकचे क्रेट आणून त्यामध्ये रोपे लावण्यात आली आहेत. वांगी, टोमॅटो या फळभाज्यांची लागवड त्यामध्ये करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसपासच्या घरांतील ओला कचरा आणून त्यात जिरवण्यात आला. सेंद्रिय खताचा वापर बागेसाठी करण्यात आला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त आशा राऊत यांच्या हस्ते या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे, माजी नगरसेवक व मोहल्ला कमिटी सदस्य यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पुणे: अकरावीच्या ३३ हजारांहून अधिक जागा रिक्त; प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छ प्रभाग मानांकन या बाबींच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालय इमारतीच्या गच्चीवर मातीविरहित फळबाग फुलवली, असे महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांनी सांगितले .प्रशासन आणि नागरिक एकत्र करून काय कायापालट करू शकतात, याचे हे आदर्श उदाहरण आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यत चांगला संदेश पोहोचेल, असे आशा राऊत यांनी सांगितले.रूपाली मगर, सहवर्धन संस्थेचे स्वयंसेवक, मोहल्ला कमिटी सदस्य, ग्रीन हिल्स संस्था आणि सुनील भिडे तसेच अर्चना गोगटे यांचे या उपक्रमाला योगदान लाभले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace gardening initiative at warje karvenagar zonal office pune print news tmb 01