शिरुर : न्हावरा – तळेगाव रस्त्यावर न्हावरा येथे कंटेनर आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलीसह तिघांचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कैलास कृष्णाजी गायकवाड ( वय – ४९ वर्ष ), गौरी कैलास गायकवाड ( वय -२० वर्ष, दोघेही रा. -निंबाळकर वस्ती, न्हावरा, ता. शिरुर. जि पुणे) तसेच गणेश महादेव निर्लेकर ( वय -२५ वर्ष रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ) हे मरण पावले. दुर्गा कैलास गायकवाड (वय – ४८ वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत . यासंदर्भात रवींद्र महादेव सोनवणे ( वय -३८ वर्षे, रा,कुटेवस्ती, न्हावरे ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

२३ मार्च रोजी रात्री कैलास कृष्णाजी गायकवाड हे मोटारीमधून पत्नी दुर्गा कैलास गायकवाड, मुलगी गौरी कैलास गायकवाड व मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर यांना घेऊन वाघोली येथून न्हावरेकडे येत होते. तळेगाव ते न्हावरे रस्त्यावरील संदीप महादेव सरके यांच्या घराशेजारी आल्यावर समोरून न्हावरे बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची मोटारीला जोरात धडक बसली. अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड, गौरी कैलास गायकवाड, गणेश महादेव नेर्लेकर हे मरण पावले, तर दुर्गा कैलास गायकवाड या गंभीर जखमी झाल्या. कंटेनरचालक फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते तपास करीत आहेत .