पुणे : येवलेवाडी भागातील काचेच्या कारखान्यात रविवारी भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७ सर्व रा. येवलेवाडी मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर जगतपाल संतराम सरोज (वय ४९ वर्षे, धंदा मजुरी, रा.धांडेकर नगर, येवलेवाडी) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहित नाही) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

हे ही वाचा…“मुख्यमंत्री कोण हे महत्त्वाचे नाही”, महायुती सरकारमधील मंत्र्याचे विधान

इंडिया ग्लास सोल्युशन या काचेच्या कारखान्यात हा गंभीर प्रकार घडला. संबंधित कारखाना हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.

येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे ‘इंडिया ग्लास सोल्युशन’ नावाचा काचेचा मोठा कारखाना आहे. या ठिकाणी मोठया आकारातील काचा आणल्या जातात. येथे या ठिकाणी काचांवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर या काचा विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. अग्निशमक दलाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिया ग्लास सोल्युशन कारखान्यात काचेचे बॉक्स अंगावर पडून कामगार अडकल्याचा फोन दुपारी एक वाजून ३६ मिनीटांनी दलाला मिळाला. त्यानुसार ८ ते १० कर्मचारी व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्यास सुरूवात केली.

हे ही वाचा…चिंचवड विधानसभा: अजित पवारांचा आणखी एक खंदा समर्थक साथ सोडणार? बंडखोरी करण्याचा इशारा…म्हणाले, “झुंडशाहीला…”

काचेचे मोठे बॉक्स घेऊन येथे आलेल्या कंटेनरमध्ये कामगार अडकल्यामुळे त्यांना बाहेर जिकरीचे होते. मात्र, तरीही अग्निशमक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साह्याने आठ ते दहा फुटांचे काचेचे बॉक्स बाजूला काढले. या काचेच्या बॉक्सखाली ६ कामगार अडकल्याचे दिसून आले. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान श्वास गुदमरून आणि अंगावर जखमा व काचेचे अति वजन पडल्यामुळे हदयक्रिया बंद पडून या चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी दोघांवर उपचार केले जात आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

हे ही वाचा…वनराज आंदेकरांच्या खूनापूर्वी दीड महिने आधी पिस्तूल खरेदी,मध्य प्रदेशातून पिस्तूले आणल्याचे उघड

कंटेनरमधून आलेले काचेचे बॉक्स खाली उतरवित असताना काही कामगार गाडीतच थांबले होते. त्यावेळी ८ ते १० फुट उंचीचे काचेचे बॉक्स अचानकपणे गाडीतच खाली कोसळले. यामध्ये सहा कामगार काचेच्या बॉक्सखाली गाडले होते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले. – समीर शेख, स्टेशन ड्युटी ऑफिसर, कोंढवा अग्निशमन केंद्र

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrible accident in glass factory in yevlewadi area four laborers died on the spot in this accident pune print news ccm 82 sud 02