पुणे : भररस्त्यात काेयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांसह सराइतांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने चाप बसला होता. काेयते बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केल्याने सराइतांना जरब बसली होती. त्यानंतर शहरात पुन्हा कोयते उगारून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
गेल्या काही दिवसांत वैमनस्य, तसेच किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. हडपसर भागात मैत्रिणीला संदेश पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. शुक्रवार पेठेतील अकरा मारुती कोपरा परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. टिळक रस्त्यावर दिवाळीनिमित्त खरेदीला आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. कोयते उगारून दहशत माजविण्याच्या एकापाठोपाठ तीन घटना घडल्याने कोयता गँगने पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा सुरू आहे.
पुणे शहरातील मांजरी, वडगाव बुद्रुक, मुंढवा, सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना सहा महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. सिंहगड महाविद्यालयाच्या आवारात कोयते उगारून दुकानदारांना धमकाविणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पाठलाग करून चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी कोयते उगारून दहशत माजविणारी अल्पवयीन मुले आणि सराइतांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पाेलीस ठाण्यांच्या प्रमुखांना कोयते बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले.
हेही वाचा… आधार कार्ड अद्ययावत केले का? पुणे जिल्ह्यातील २९ लाख नागरिकांची आधार कार्ड अद्ययावत करणाकडे पाठ
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी कोयते बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. कोयते बाळगून दहशत माजविणाऱ्या सराइतांची पोलिसांनी धिंड काढली, तसेच कोयते विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेने बोहरी आळी परिसरातील दुकानांतून मोठ्या प्रमाणावर कोयते जप्त केले. आकर्षणापोटी गु्न्हेगारीकडे वळालेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. अल्पवयीन मुलांचे पोलीस ठाण्यांच्या पातळीवर समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना कमी झाल्या. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसात कोयते उगारून हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. कोयता गँगने पुन्हा डोके वर काढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
हेही वाचा… ‘पुणेकर’ असल्याचा सुनील देवधरांचा प्रचार; लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने गाठीभेटी सुरू
टिळक रस्त्यावर तरुणावर वार
टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय मलाप्पा शिंगे (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिंगे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय, त्याचे मित्र करण धिवार, मुज्जमीर शेख दिवाळीनिमित्त टिळक रस्त्यावरील वस्त्र दालनात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी पदपथावरून आलेल्या तिघांनी शिंगेवर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक नानेकर तपास करत आहेत.
पेट्रोल पंपावरील कामगारांना लुटले
पेट्रोल पंपावरील कामगारांना कोयत्याचा धाक दाखवून २८ हजार रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना लोहगाव-वाघोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल भीमराव पिंगळे (वय २४, रा. लोहगाव-वाघोली रस्ता) याने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंगळे लोहगाव-वाघोली रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपावर कामगार आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास राहुल आणि पंपावरील सहकारी कामगार कार्यालयात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण पंपावर आले. चोरट्यांनी कापडाने चेहरा झाकला होता.
चोरटे कार्यालयात शिरले. पंपावरील कामगारांना कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील २८ हजार ८७० रुपये लुटून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पोटे तपास करत आहेत.