पुणे : निवडणुकीच्या तोंडावर शहरात टाेळक्याकडून दहशत माजविण्यच्या घटना वाढीस लागल्या आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, याप्रकरणी वारजे, पर्वती, चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात दुचाकी आडवी घातल्याच्या कारणावरुन टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले. याप्रकरणी आकाश म्हस्के, गणेश रेणुसे, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालवे, मयूर पालखे, प्रथमेश रेणुसे, अजय घाडगे यांच्यासह एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत समीर आत्माराम महादे (वय ३२, रा. सिद्धार्थ शोरुमजवळ, सिंहगड रस्ता) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पिंपरी : पहिल्याचदिवशी विद्यमान आमदारांसह प्रमुख पक्षांतील इच्छुकां
दुचाकी आडवी घालण्यावरुन आरोपी आणि फिर्यादी म्हस्के यांच्या मित्रांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महादे, त्याचे मित्र रिची म्हस्के, आकाश सूर्यवंशी, मीर खोचाडे, यश डोळे, अजित थोरात, अथर्व रणदिवे आरोपींनी समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्या वेळी महादेचा मावसभाऊ संतोष साळुंके याने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपी तेजस नायरने त्याच्याकडील कोयत्याने साळुंके याच्या डोक्यात काेयत्याने वार केला. महादे आणि रिची म्हस्के यांना दगड फेकून मारला. आरोपींनी दहशत माजविल्याने परिसरात घबराट उडाली. सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.
चंदननगर भागात वैमनस्यातून तरुणाला दांडके आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अमित दिलीप आरणे (वय ३५, रा. निलेश आंगण सोसायटी, आनंद पार्क, वडगाव शेरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कैलास शंकरलाल भाटी (वय २४), सोहनराम अस्लाराम प्रजापती (वय २८), दीपककुमार दलाराम प्रजापती (वय २०), विक्रम नगाराम प्रजापती (वय १९), चंदन केशराम मेघवाल (वय २०), सुखदेव पूनराम मेघवाल (वय २२, सर्व रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरणेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री वडगाव शेरीतील मद्य विक्री दुकानात आरणे गेला होता. त्या वेळी वैमनस्यातून आरोपींनी आरणेला शिवीगाळ करुन दांडके आणि गजाने बेदम मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.
हेही वाचा >>>आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या; सातजणांविरुद्ध गुन्हा
कर्वेनगर भागात वैमनस्यातून तरुणावर टोळक्याने हल्ला केला. याप्रकरणी रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारे यांच्यासह १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात प्रतीक भोकरे (वय ३३), रोहित रहाटे (वय १८), नितीन रुपचंद जमादार (वय २८, रा. वडगाव बुद्रुक) जखमी झाले. याबाबत जमादारने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम उफाळेचा आरोपींशी वाद होता. वादातून उफाळेचे मित्र भोकरे, रहाटे, जमादार यांना कर्वेनगर भागात टोळक्याने गाठले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच सिमेंटचे गट्टू फेकून मारले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत.