पुणे : वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. आतिष जालिंदर लांडगे (वय २६,रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लांडगे याने वाढदिवसानिमित्त कासेवाडीत हातात कोयता घेऊन भरचौकात दहशत माजविली. कोयत्याने केक कापून त्याने समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानंतर लांडगेला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लांडगेला अटक करण्यात आली असून खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर आदींनी ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर

दहशत माजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई

गेल्या काही महिन्यांपासून वाढदिवसानिमित्त भरचौकात रात्री-अपरात्री दहशत माजवून शस्त्राने केक कापण्याचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorizing birthday cake cut crime police arrest social media pune print news ysh