मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने टेस्ट ड्राइव्ह करून पाहतो म्हणून मोटारसायकल घेऊन पळून गेल्याचा प्रकार नऱ्हे आंबेगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय पाटील (वय ३५, रा. नऱ्हे आंबेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्याकडे असलेली मोटारसायल त्यांना विक्री करायची होती. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल विक्री करण्याबाबतची जाहिरात ‘क्वीकर डॉटकॉम’ या संकेतस्थळावर दिली होती. ही जाहिरात पाहून बुधवारी सकाळी एक व्यक्ती त्यांच्या नऱ्हे आंबेगाव येथील घरी आली. त्या व्यक्तीने त्याला मोटारसायकल खरेदी करायची असून विक्रीसाठी असलेल्या मोटारसायकलची सर्व माहिती पाटील यांच्याकडून घेतली.
मोटारसायकलच्या किमतीवर चर्चा झाल्यानंतर त्या व्यक्तीने ‘टेस्ट ड्राइव्ह घेतो’ म्हणून त्यांच्याकडून मोटारसायकलची चावी मागून घेतली. पाटील यांनी त्या व्यक्तीला विश्वासाने चावी दिली. ती व्यक्ती टेस्ट ड्राइव्हसाठी ती मोटारसायकल घेऊन गेली. पण, बराच वेळ झाला तरी ती व्यक्ती परत न आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी रस्त्यावर जाऊन पाहणी केली. पण, टेस्ट ड्राइव्हसाठी आलेल्या व्यक्तीने फसवून मोटारसायकल चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आटोळे हे अधिक तपास करीत आहेत.
‘टेस्ट ड्राइव्ह’च्या बहाण्याने मोटारसायकल पळवून नेली
पाटील यांच्याकडे असलेली मोटारसायल त्यांना विक्री करायची होती. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल विक्री करण्याबाबतची जाहिरात ‘क्वीकर डॉटकॉम’ या संकेतस्थळावर दिली होती.
First published on: 08-02-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Test drive motorcycle crime deceive