पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दूषित पाण्याद्वारे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील खासगी विहिरी, बोअरवेल, टँकरमार्फत पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. पिण्याचे पाणी जारद्वारे वितरित करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेऊन आयुक्तांनी सोमवारी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.

गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण सर्व वयोगटांतील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. दूषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा होत असताना कोणत्याही परिस्थितीत दूषित पाण्याचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी मोहीम तीव्र करावी. विहिरींची माहिती संकलित करून पाणी नमुन्यांची तपासणी करावी. दूषित पाणी आढळून आल्यास त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

‘वायसीएम’, नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये मोफत उपचार

या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधोपचार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (वायसीएम) इतर रुग्णालयांत उपलब्ध आहेत. या आजाराचे उपचार ‘एकत्रित महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’मध्ये समाविष्ट आहेत. वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत रुग्णांकरिता मोफत उपचार केले जाणार आहेत.

३,९८६ घरांची तपासणी

शहरात या आजारचे १५ संशयित रुग्ण आहेत. सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्याकरिता आठ रुग्णालय विभागांतर्गत प्रत्येकी दोन असे एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आजअखेर तीन हजार ९८६ घरे तपासण्यात आली आहेत. यामध्ये आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा नवीन आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हाता-पायातील ताकद कमी होणे, मुंग्या येणे, गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित महापालिका रुग्णालयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे, उघड्यावरील अन्न खाऊ नये, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.