पुणे : शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्‍या शिक्षक पात्रता परीक्षेत या पूर्वी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. या गैरप्रकारामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. अनेक अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटकही झाली. या पार्श्वभूमीवर येत्‍या रविवारी (१० नोव्हेंबर) राज्यभरात होत असलेल्या टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे प्रत्‍येक परीक्षा केंद्रावर देखरेख केली जाणार आहे. यात परीक्षा केंद्रात जाताना प्रत्‍येक उमेदवारांची फेस रीडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्‍टर असे उपाय करण्यात आले असून, प्रत्‍येक वर्गखोलीत सीसीटीव्‍ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्‍यामुळे यंदाच्‍या टीईटी परीक्षेतील कोणतीही गैरप्रकार होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षेच्या आयोजनाची माहिती राज्‍य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे आणि आयुक्‍त अनुराधा ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यातील एकूण १ हजार २३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ९ ते ३० सप्‍टेंबरची मुदत देण्यात आली होती. त्‍यानुसार एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा – पिंपरी विधानसभा: फलकाद्वारे अजित पवारांच्या आमदाराला विचारण्यात आले विविध प्रश्न; गुन्हेगारी, वाहतूक कोंडीचा केला उल्लेख

परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना प्रत्‍येक उमेदवार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेटल डिटेक्‍टरच्‍या साहाय्याने तपासणी केली जाणार आहे. त्‍यामुळे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरताना दिलेल्या छायाचित्रांचा उपयोग करून साठा करण्यात आला आहे. उमेदवार परीक्षा केंद्रात प्रवेश करीत असताना त्‍याचे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवली जाणार असल्याने परीक्षा देणारा, नोंदणी केलेल्या उमेदवाराची छायाचित्र पडताळणी करून तोच उमेदवार असल्याची खात्री करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षा केंद्रावर, परीक्षा कक्षात सीसीटीव्‍ही बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना सेन्सर आहेत. या यंत्रणेवर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्‍त गर्दी झाल्‍यास, परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनी फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी उभे राहिल्‍यास, विद्यार्थ्यांनी बैठक व्‍यवस्‍थेत बदल केल्यास, गैरप्रकाराच्‍या हालचाली झाल्‍यास तत्‍काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी व परीक्षा परिषदेच्‍या कार्यालयातील नियंत्रण कक्षात त्याबाबत कळणार आहे.

हेही वाचा – ‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

वेळेत न पोहोचल्यास प्रवेशास मनाई

टीईटीचे दोन पेपर होणार आहेत. त्‍यातील पहिला पेपर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत, तर दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. परीक्षेपूर्वी दीड तास आधी परीक्षा केंद्रात पोहोचणे अनिवार्य आहे. त्यानुसार सकाळी नऊ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. वेळ न पाळणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे बेडसे यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tet ai what are the measures to prevent malpractices print politics news ccp 14 ssb