पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी, आक्षेप नोंदवण्यासाठीचा अर्ज १ ते ६ फेब्रुुवारी या कालावधीत करता येणार आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी राज्यभरात टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यात पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक आणि सहावी ते आठवीसाठीच्या पेपर दोनचा समावेश होता. या परीक्षेचा अंतरिम निकाल http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी, आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अन्य मार्गाने केलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. निकाल राखीव ठेवलेल्या उमेदवारांना त्यांचे निवेदन सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.