शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना येत्या वर्षांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने शिक्षक भरतीवर घातलेली बंदी उठवली आहे. मात्र, शिक्षक भरतीसाठी आता पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्यात येणार का, याबाबत अजूनही निश्चित निर्णय झाला नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात २०११ मध्ये राबवण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेनंतर शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. पटपडतळणीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होई पर्यंत शिक्षकभरतीवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, शासनाने भरतीवरील बंदी अखेरीस उठवली आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वरकरणी तरी दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही शिक्षकांच्या समायोजनाची मेख या निर्णयाला आहे.
अद्यापही राज्यात साधारण २ हजार शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. गेली दोन वर्षे सुरू असलेले शिक्षकांचे समायोजन अद्यापही पूर्ण झालेले नाही. समायोजन झाल्यानंतरच भरतीची कार्यवाही सुरू करावी, असे या संबंधीच्या शासन निर्णयात म्हटले आहे. भरती सुरू झाल्यावरही न्यायालयाच्या आदेशानुसार २०१० च्या प्रवेश परीक्षेमध्ये पात्र ठरूनही बेकार राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर नियमित भरती प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने शिक्षक भरती करण्यासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी का याबाबतही शासन स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही.

Story img Loader